पेट्रोल-डिझेलपासून भाजीपाला आणि डाळींच्या वाढत्या दराने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोहरीचे तेल, पाम तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसामुळे पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाच्या आकडेवारीनुसार, देशभरात मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत सध्या १९७.२५ रुपये प्रति किलो आहे. एका महिन्यापूर्वी हा दर १९४.१५ रुपये होता. तर १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत केवळ ११८.२० रुपये होती. त्यामुळे वर्षभरात मोहरीच्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
पाम आणि सूर्यफूल तेलही महागले
पाम तेलाच्या दरातही वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी पाम तेलाचा दर १४९.५७ रुपये प्रति किलो होता, तर मागील वर्षी याच दिवशी तो १३०.२४ रुपये होता. म्हणजेच सुमारे २० रुपयांची वाढ झाली असून, ही वाढ जवळपास १४ टक्के आहे.
सूर्यफूल तेलाच्या किमतीतही सुमारे १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी सूर्यफूल तेलाचा दर १५९ रुपये प्रति किलो होता. आता तो १९१.१६ रुपयांवर पोहोचला आहे.
शेंगदाणा तेलाच्या दरातही वाढ झाली असून, सध्या त्याचा दर २०५.३९ रुपये प्रति किलो आहे. मागील वर्षी याच दिवशी शेंगदाणा तेलाचा दर १८५.२६ रुपये होता. म्हणजेच वर्षभरात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
पावसाचा पुरवठ्यावर परिणाम
पावसामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक आणि पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमतीही वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम खाद्यतेलाच्या बाजारावरही जाणवत आहे. आगामी काळात पुरवठा सुरळीत झाला नाही, तर खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने निर्यात होणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात करून तेल कंपन्यांना दिलासा दिला आहे. मात्र, या निर्णयाचा खाद्यतेलाच्या वाढत्या दरांवर थेट किती परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.















Discussion about this post