जळगाव । मालमत्तेच्या कागदपत्रांवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद एका महिलेच्या हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना चार वर्षांपूर्वी जळगावात घडली होती. पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनीत झालेल्या योगिता मुकेश सोनार यांच्या खूनप्रकरणी त्यांचा सख्खा दीर दिपक लोटन सोनार याला जळगाव जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार आणि पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,आरोपी दिपक सोनार आणि त्याची भावजय योगिता सोनार यांच्यात मालमत्तेच्या कागदपत्रांवरून वारंवार वाद होत होते. २१ मे २०२२ रोजी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आणि विकोपाला गेला.संतापाच्या भरात दिपकने योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने भीषण वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या योगिता यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी कुऱ्हाड घटनास्थळीच फेकून तेथून पसार झाला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. याशिवाय सरकार पक्षाच्या वतीने एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडताना पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्ष आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची न्यायालयात भक्कम मांडणी केली.
न्यायालयाचा अंतिम निकाल
सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांनी आरोपी दिपक लोटन सोनार याला हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला. तब्बल चार वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे सोनार कुटुंबातील या वादग्रस्त प्रकरणाला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे.















Discussion about this post