नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, या घडामोडीमुळे राजधानी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला आहे. मात्र, भाजपकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राजीनाम्यानंतर पुनावाला यांनी त्यांच्या एक्स (X) खात्यावरील बायोमध्येही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी ‘भाजप राष्ट्रीय प्रवक्ते’ असा उल्लेख हटवला असून, पदासंदर्भातील माहितीही काढून टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला आणखी वेग आला आहे.
सीएनएन-न्यूज18च्या वृत्तानुसार, शहजाद पुनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपकडूनही याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
एक्स बायोमध्ये मोदींचा उल्लेख कायम
राजीनाम्यानंतरही पुनावाला यांनी त्यांच्या एक्स बायोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील निष्ठा कायम असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी स्वतःचा परिचय देताना “धर्म – इस्लाम, संस्कृती – हिंदू, विचारधारा – भारतीय, लेखक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी” असा उल्लेख केला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश
शहजाद पुनावाला यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर टीका करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. विविध टीव्ही चर्चांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत होते.
यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले होते. मात्र, त्यानंतरही ते पक्षाची बाजू ठामपणे मांडत राहिले. त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामागील नेमके कारण काय, याबाबत अद्यापही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.















Discussion about this post