नवी दिल्ली : अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला. विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यांनी “स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त” अशा तीन श्रेणींचा उल्लेख केला. यावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत सांगितले की, “विद्यार्थी सत्याच्या मागे धावतो, त्याचा मेंदू खुला असतो आणि आपल्याला सर्व काही माहीत नाही, याची त्याला जाणीव असते.” एका विद्यार्थिनीने दिलेल्या या व्याख्येचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या विचारसरणीबाबत भाष्य केले.
यानंतर त्यांनी “इडियट” आणि “अंधभक्त” या शब्दांचा वापर करत काही लोक फक्त आपल्या प्रतिमेची काळजी घेतात आणि आंधळेपणाने व्यक्तीपूजा करतात, असे विधान केले. या वक्तव्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेत राहुल गांधी यांनी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप केला.
त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत संबंधित शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी केली. सभापतींच्या निर्देशानंतर हे शब्द लोकसभेच्या अधिकृत नोंदीतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा भाषण सुरू केले, मात्र तीन श्रेणींचा थेट उल्लेख टाळून आपले मत मांडले.
भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “अँटी पेपर लीक विधेयकावर इतकी महत्त्वाची चर्चा सुरू असताना पंतप्रधान सभागृहात उपस्थित नाहीत. सभागृहात येऊन बसण्याची त्यांच्यात हिंमत नाही,” असा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्रीय गृहमंत्रीही सभागृहात का उपस्थित नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेत काही काळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले.















Discussion about this post