मुंबई । नीट परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा मार्च’ पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हा मोर्चा पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी असून त्याला कोणताही पक्षीय रंग दिला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
फेसबुकवरील पोस्टद्वारे राज ठाकरे यांनी सांगितले की, हा मोर्चा दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि देशभरातील विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करण्यासाठी काढण्यात येत आहे. दिल्लीला जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश या मोर्चातून दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
पक्षाचे झेंडे आणि नेत्यांच्या घोषणा नको
मोर्चा पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या. मोर्चामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे आणू नयेत, तसेच कोणत्याही नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊ नयेत, असे त्यांनी आवाहन केले. सरकारविरोधातील निषेध आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनाच्या घोषणाच या मोर्चात दिल्या जाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, मोर्च्याचे निमंत्रक ते आणि उद्धव ठाकरे असले तरी त्यांच्या नावानेही घोषणा देऊ नयेत. “हा विद्यार्थ्यांचा लढा आहे, त्याचे गांभीर्य आणि पावित्र्य कायम ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी मनसे सैनिक, शिवसैनिक तसेच सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. विशेषतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, तसेच मोर्चादरम्यान त्यांची सुरक्षितता आणि सोयीची काळजी घ्यावी, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. रविवार, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. शांततापूर्ण मार्गाने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा आवाज बुलंद करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post