मुंबई । नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी मागणी केली आहे. “NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा,” अशी थेट भूमिका त्यांनी मांडली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या त्रुटी आणि केंद्रीकृत परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच विरोधी पक्षांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले होते.
ABOLISH NEET!
DECENTRALISE EDUCATION! pic.twitter.com/KGSexFQQ8s
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 24, 2026
NEET प्रक्रियेवर गंभीर प्रश्न
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही NEET परीक्षेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पहिल्या परीक्षेत मोठ्या त्रुटी झाल्या असून फेरपरीक्षेतही अनेक अनियमितता समोर आल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून सरकारच्या भूमिकेमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पेपरफुटीच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर लीकविरोधी कायदा अधिक कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित कायद्याद्वारे परीक्षा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाईची तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि सरकारची भूमिका यामुळे देशभरात शिक्षण व्यवस्थेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post