नवी दिल्ली | नीट (NEET) पेपर लीक प्रकरण आणि जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी १९९४ बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारने विनीत जोशी यांची पंचायती राज मंत्रालयात बदली केली असून, नव्या सचिव म्हणून नरेश पाल गंगवार यांच्यावर देशातील उच्च शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पेपर लीक प्रकरणामुळे वाढला दबाव
गेल्या काही दिवसांपासून NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली जात आहे. या वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
अनुभवी अधिकाऱ्याकडे सूत्रे
नवे सचिव नरेश पाल गंगवार यांनी आयआयटी दिल्ली आणि रुडकी विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी यापूर्वी पर्यावरण मंत्रालय तसेच पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे. प्रशासकीय अनुभवाच्या बळावर आता देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे, पारदर्शकता वाढविणे आणि विद्यार्थ्यांमधील नाराजी कमी करणे, ही मोठी जबाबदारी त्यांच्यासमोर असणार आहे.














Discussion about this post