नवी दिल्ली | नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी गेल्या २६ दिवसांपासून आमरण उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उपोषण सोडताना वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील उपस्थित होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनांचे पत्र वाचून दाखवले. सरकारने संसदेवरील मोर्चा आणि जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
याशिवाय, नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दिनचर्या ठरवावी आणि लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचे मोदींनी म्हटले.
पेपर लीकविरोधी विधेयकाची घोषणा
यापूर्वी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीक रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईची तरतूद असलेले विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल, अशी घोषणा केली. या विधेयकाच्या मसुद्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असून ते लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post