नशिराबाद : नशिराबाद-सुनसगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतात सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत जबरदस्तीने देहविक्रीत ढकलण्यात आल्याचा संशय असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून ९१ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांना नशिराबाद-सुनसगाव मार्गावरील एका शेतात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंटरमार्फत पडताळणी केली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. छाप्यामध्ये प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) आणि कैलास संजय भोई (दोघे रा. नशिराबाद) हे देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत अटक केली.
दोन महिलांची सुटका
या कारवाईदरम्यान देहविक्रीसाठी जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचा संशय असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक मदतीसाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकींसह विविध साहित्य असा एकूण ९१,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.















Discussion about this post