नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने आता संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) सोमवारी ‘चलो संसद’चे आवाहन केल्यानंतर आंदोलक संसदेकडे निघाले. यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाल्याचा आरोप CJPचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लाठीमारात एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी अमानुष वागणूक का देत आहे, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे उपस्थित केला.
दिपके यांनी आणखी एका पोस्टमध्ये आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची आणि महिला आंदोलकांची माफी मागितली. दिल्ली पोलिसांच्या कारवाईपासून आंदोलकांचे संरक्षण करण्यात आपण अपयशी ठरलो, असे सांगत जखमी विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रविवारी पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरवरून हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पावसातही आंदोलकांनी तेथेच ठिय्या कायम ठेवला. सोमवारी सकाळपासून पुन्हा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जंतरमंतरवर जमा झाले असून त्यांनी आंदोलनाचे व्यासपीठ पुन्हा उभारून आंदोलन सुरू केले.
सरकारसोबतची चर्चा निष्फळ
आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी CJPच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि NEET प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कॉकरोच जनता पार्टीने व्यक्त केला आहे.















Discussion about this post