जळगाव : जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडताच वाहनचालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला थांबवली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने कारला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पुलावरच कारला आग लागल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या घटनेमुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाहनाला नेमकी कशामुळे आग लागली याबाबत अधिक तपास सुरू असून, तांत्रिक बिघाड हेच प्राथमिक कारण असल्याची माहिती समोर आली आहे.















Discussion about this post