भुसावळ | भुसावळ शहरातील रेल्वेच्या कवाडे नगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टर हाऊस) येथे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे परिसरासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मृत कर्मचाऱ्याचे नाव प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) असून ते गेल्या दहा वर्षांपासून रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये कार्यरत होते. शनिवारी सायंकाळच्या शिफ्टमध्ये ते नेहमीप्रमाणे कामावर असताना आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर) हा तेथे आला. त्याने परिसरात पडलेला लोखंडी रॉड उचलून कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात कुलकर्णी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी आकाश गोरखा याला काही वेळातच अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे भुसावळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा झालेल्या या हत्येमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.














Discussion about this post