जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या जामनेर शहरातील मदनीनगर परिसरात घडलेल्या लाखोंच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा जामनेर पोलिसांनी अल्पावधीतच उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याचाही छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनीनगर येथील रहिवासी मसुद अख्तर मुजफ्फर हुसेन (वय ५०) हे २५ ते २९ जूनदरम्यान कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. घरातील कपाट फोडून ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने मोहम्मद फातिर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद आणि शेख अमीर शेख जाकीर यांच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी मोहम्मद फातिर याला जामनेर येथून, तर शेख अमीर याला नाशिक येथून अटक केली. आरोपींकडून चोरीतील ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदी, ७१ हजार ५०० रुपयांची रोकड आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, जामनेर पोलिसांनी दुसऱ्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचाही यशस्वी तपास करत आरिफखान लालखान कंजर (रा. सोनारी) आणि मुबारीक अली खान (रा. केरपाणी, मध्य प्रदेश) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली क्रमांक नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे आणि जामनेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली. घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात मिळालेल्या या यशामुळे जामनेर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.















Discussion about this post