चंद्रपूर । चंद्रपूरमध्ये नवजात बाळाच्या विक्रीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, या रॅकेटमध्ये भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप समोर आला आहे. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या हव्यासापोटी नवजात बाळाचा सौदा करण्यात आल्याच्या प्रकरणाचा रामनगर पोलिसांनी सखोल तपास केला. जवळपास महिनाभर चाललेल्या तपासानंतर या मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील कार्यकर्त्या सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना अटक करण्यात आली आहे. दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा पैशांसाठी सौदा केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अजय फुलझेले, पीडित मुलीची आई तसेच बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
दरम्यान, या मानवी तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासादरम्यान दोन महिला राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे.















Discussion about this post