परभणी । परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग अचानक कोसळला. त्याखाली अंदाजे ३० ते ४० भाविक दबल्याची प्राथमिक माहिती मिळते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अनेक जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वृत्तांनुसार जीवितहानीची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा आहे.
शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. मंदिराच्या छताच्या भागाखाली अडकल्याने 5 ते 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 30 ते 40 भाविक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाला बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यक सर्व मदत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहितीनुसारच प्रतिक्रिया देण्याचे सांगितले आहे. बचावकार्य सुरू असल्याने जखमी आणि मृतांचा अंतिम आकडा पुढील काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post