मुंबई । शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांनी शिवसेना काँग्रेसच्या जवळ गेल्यामुळेच खासदारांनी पक्ष सोडल्याची टीका केली होती. त्यावर राऊत यांनी भाजपवर आणि महाजनांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी असल्याची माहिती संबंधित खासदारांना निवडणुकीच्या वेळीही होती. त्याच आघाडीच्या पाठिंब्यावर ते निवडून आले आणि आता काँग्रेसवर टीका करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. त्यामुळे काँग्रेसबाबत अवमानकारक वक्तव्य करण्याऐवजी इतिहासाचा आदर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेतील घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी, “याला पक्षफूट म्हणता येणार नाही. विचारांसाठी पक्ष सोडला तर ते बंड असते, मात्र सत्तेसाठी किंवा इतर कारणांसाठी पक्ष बदलणे म्हणजे स्वतःला विकणे होय,” असा दावा केला. संबंधित खासदारांनी कोणताही वैचारिक मुद्दा मांडलेला नसून त्यांनी स्वार्थासाठी निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेच्या विचारसरणीबाबत प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी बंडखोर खासदारांवर टीका केली आणि “ते कोणत्या विचारासाठी पक्ष सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे,” असे आवाहन केले. सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.















Discussion about this post