जळगाव । जळगावच्या तरुण हॉटेल व्यावसायिकाचा मुंबईतील वर्सोवा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. पवन सुनील पाटील (रा. अयोध्यानगर, जळगाव) यांचा हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात शोककळा पसरली असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मूळचे नशिराबाद येथील असलेले पवन पाटील गेल्या काही वर्षांपासून मुंबईत हॉटेल व्यवसाय करत होते. गुरुवारी सकाळी वर्सोवा येथील हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून ते खाली कोसळल्याची घटना घडली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पवन यांच्या पश्चात आई आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईक मुंबईकडे रवाना झाले. या घटनेमुळे जळगावातील अयोध्यानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वर्सोवा पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासत असून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.















Discussion about this post