जळगाव । शहरातील तांबापुरा भागातील गवळी वाडा परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका घरामध्ये बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ जणांसह इतर काही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (SDPO) तत्परतेमुळे अवघ्या ५ मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा भागातील रहिवासी फिर्यादी रजीयाबी हनिफ काकर या दिनांक १८ जून २०२६ रोजी पहाटे १.०० वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्या काही वेळाने परत आल्या असता, त्यांना त्यांच्या घरातून तोडफोड आणि शिवीगाळीचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिले असता, परिसरातील संशयित आरोपी विशाल उर्फ बाप्पू भोई, विनोद हटकर, पांड्या हटकर, कमलेश गवळी, राहुल गवळी (सर्व रा. गवळी वाडा, तांबापुरा) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही इसमांनी हातात दगड घेऊन बेकायदेशीर जमाव जमवला होता.
फिर्यादीचा मुलगा यापूर्वी तांबापुरा भागात झालेल्या एका भांडणात सहभागी असल्याचा राग मनात धरून, या आरोपींनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यांनी “तुझे घर फोडून टाकू” अशी धमकी देत घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली व दगडफेक करून नुकसान केले. घटना घडली तेव्हा सुदैवाने जळगाव शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे रात्रीच्या गस्तीवर होते. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केवळ ५ मिनिटांत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळावर तातडीने ‘आरसीपी’ (RCP) बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या संपूर्ण परिसरात शांतता आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.















Discussion about this post