जळगाव : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या चर्चांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत बोचरी टीका केली.
जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, “यासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही. मी कालच मुंबईहून आलो असून कोणते मिशन सुरू आहे याची कल्पना नाही,” असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान एका पत्रकाराने, “हे सर्व संजय राऊत यांच्यामुळे घडत आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मला त्याबाबत माहिती नाही. मात्र संजय राऊत हे पांढऱ्या पायाचा माणूस आहेत. त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्षाची अधोगती सुरू झाली. त्यामुळे त्यांचा पाय पांढऱ्याऐवजी काळा कसा होईल, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे.”
राजकीय घडामोडींना वेग
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून उद्धव ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा केला जात आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकते. त्यामुळे या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, संबंधित खासदारांचा गट भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post