जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत अधिक मास संपण्यापूर्वी सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी वेग घेतला असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारावरही दिसून आला असून सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्यासाठी सुरू झालेल्या शांतता प्रयत्नांमुळे जागतिक बाजारात हालचाली वाढल्या असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस ४,३०४.११ डॉलर इतका पोहोचला असून ९ जूननंतरची ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे.
जळगावात सोन्याच्या दरात मोठी वाढ
शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३०९ रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह प्रति १० ग्रॅम दर १ लाख ५२ हजार ७४९ रुपये झाला होता. त्यानंतर सोमवारी बाजार सुरू होताच आणखी २,४७२ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा दर १ लाख ५५ हजार २२१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका पोहोचला.
चांदीनेही घेतली मोठी झेप
चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. शनिवारी प्रति किलो दरात ४,१२० रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव २ लाख ५७ हजार ५०० रुपये झाला होता. सोमवारी त्यात आणखी ५,१५० रुपयांची भर पडल्याने जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर २ लाख ६२ हजार ६५० रुपये इतका झाला.
ग्राहकांमध्ये चिंता
सोन्या-चांदीच्या दरातील या सातत्यपूर्ण वाढीमुळे लग्नसराई तसेच गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि आर्थिक परिस्थितीनुसार दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.















Discussion about this post