उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्याने राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांना शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर शिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी करत राज्यातील शाळांच्या प्रारंभाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, उर्वरित महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवार, १५ जून २०२६ पासून नियमित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत. मात्र, विदर्भातील वाढत्या उष्णतेचा विचार करून तेथील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला असून विदर्भातील शाळा सोमवार, २२ जून २०२६ पासून सुरू होतील.
शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टीत एकसमानता आणण्यासाठी यापूर्वी सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या जनहित याचिकेची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून २२ जून ते ३० जून या कालावधीत तेथील शाळा सकाळच्या सत्रात भरतील. त्यानंतर जुलै २०२६ पासून सर्व शाळा नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून नियमित वेळेत सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.















Discussion about this post