जळगाव औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) परिसरातील एका कुलर निर्मिती कारखान्याला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीत कारखान्यातील कच्चा माल, तयार कुलर आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एल सेक्टरमधील कुलर उत्पादन करणाऱ्या कंपनीत काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कुलरसाठी वापरण्यात येणारे सुके गवत (पॅड), प्लास्टिक साहित्य आणि अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागलेल्या कारखान्यालगतच लाकडाची मोठी वखार असल्याने आग तेथे पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न करत सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कच्चा माल आणि तयार उत्पादने पूर्णपणे जळून गेली आहेत. कंपनीचे मालक लल्लन यादव यांनी आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती दिली असून आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.














Discussion about this post