अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या तात्पुरता युद्धविराम सुरू असला तरी दोन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. आता अमेरिकेकडून इराणच्या हद्दीत थेट घुसून भीषण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेने इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या रडार आणि ड्रोन साईट्सना लक्ष्य केले असून, यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
एअर डिफेन्स सिस्टम आणि ड्रोन नष्ट
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यात इराणची आधुनिक एअर डिफेन्स सिस्टम (हवाई संरक्षण यंत्रणा) आणि ड्रोन निर्मिती केंद्र पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. इराणकडून होणारे संभाव्य ड्रोन हल्ले रोखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
दुसरीकडे, इराणने मात्र अमेरिकेचा हा दावा साफ फेटाळून लावला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात आमचे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे इराणने म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आपण अमेरिकेच्याच लष्करी एअरबेसवर (विमानतळावर) यशस्वी हल्ला केल्याचा प्रतिदावा इराणकडून करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी तणाव शिगेला पोहोचला आहे.















Discussion about this post