जळगाव | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शेवटच्या दिवशी तब्बल १६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केल्याने आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच गजबजलेले वातावरण होते. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात निवडणुकीची उत्सुकता स्पष्टपणे जाणवत होती. उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये महायुतीतर्फे भाजपचे नंदकिशोर भागवत महाजन यांनी तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे शरद शामराव तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच प्रवीण गंगाराम पाटील, चौधरी निलेश सुरेश, आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, सुनील नेमिदास जंगले, शेख दानिश शेख निसार, जावेद इकबाल अब्दुल रशीद, , शरद शामराव तायडे, सचिन संतोष चौधरी, अनिल छबिलदास चौधरी, रेश्मा कुंदन काळे, दीपक काशिनाथ धांडे, निलेश गणेश झोपे, कलीमखान हैदरखान मनियार, हितेंद्र रमेश देशमुख आणि घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष छाननी प्रक्रियेकडे लागले आहे. त्यानंतर अर्ज माघारीच्या कालावधीत कोणते उमेदवार माघार घेतात आणि अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतात, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
सध्या तरी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे. आगामी काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post