मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जागावाटपावरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून १७ पैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महायुतीच्या जागावाटपात भाजपने सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४ जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपचा वरचष्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार असल्याने अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगणार आहे. काही मतदारसंघांमध्ये स्थानिक समीकरणे आणि अपक्षांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असताना सर्व प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. आता लक्ष लागले आहे ते प्रचाराच्या रणधुमाळीकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या मतांवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्याने प्रत्येक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील ही लढत आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जात असून, अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी..
भाजपचे उमेदवार कोणते?
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर
सोलापूर – राजेंद्र राऊत
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
नागपूर – डॉ.राजीव पोतदार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखानी
अमरावती – प्रविण पोटे पाटील
सांगली-सातारा – धैर्यशील कदम
जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
शिवसेना
1) ठाणे – रवींद्र फाटक
2) नाशिक – नरेंद्र दराडे
3) परभणी – सईद खान
4) यवतमाळ – दुष्यंन्त चतुर्वेदी/शितल राठोड यांची नावं चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस
1) कोकण – अनिकेत तटकरे
2) पुणे – विक्रम काकडे















Discussion about this post