नवी दिल्ली । आगामी काळातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक मोर्चेबांधणीसाठी काँग्रेस पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) ज्याप्रमाणे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपली रणनीती आखून कामाला लागतो, त्याच धर्तीवर काँग्रेसनेही आता सतत ‘इलेक्शन मोड’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर अत्यंत उच्चस्तरीय आणि मोठे फेरबदल केले जाण्याची दाट शक्यता आहे.
दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार
काँग्रेस हायकमांडकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळागाळातील संघटना मजबूत करण्यासाठी पक्ष आता सक्रिय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी बदलण्याबाबत पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे. संघटनात्मक गरजा आणि स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेऊन लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
काँग्रेस पक्ष आता दक्षिण भारतातील राज्यांवर आपले लक्ष अधिक केंद्रित करणार आहे. या धोरणांतर्गत केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी तरुण व कार्यक्षम नेतृत्वाकडे ही जबाबदारी सोपवली जाईल, असे समजते.
महाराष्ट्रासह ३ राज्यांना मिळणार नवे प्रभारी
काँग्रेस केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे, तर प्रभारी स्तरावरही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांसाठी लवकरच नवीन प्रभारींची नियुक्ती केली जाऊ शकते. राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करणे, पक्षांतर्गत समन्वय सुधारणे आणि प्रभावी निवडणूक रणनीती सुनिश्चित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता
केरळ
तामिळनाडू
कर्नाटक
दिल्ली
पंजाब
छत्तीसगड
राजस्थान
या राज्यातील प्रभारी बदलले जाणार
आसाम
तमिळनाडू
महाराष्ट्र














Discussion about this post