चोपडा । चोपडा शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा चोपडा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी व्यापाराविरोधात पोलिसांनी टाकलेल्या या धडक छाप्यामध्ये राजस्थान आणि नेपाळ येथील ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ महिला आरोपींना जागेवरच अटक केली असून, फरार झालेल्या इतर ९ आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे २९ मे रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे आणि तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमी रस्त्यालगत एका ठिकाणी हा अड्डा सुरू होता. संशयित आरोपी येथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना आश्रय देऊन, त्यांच्याकडून सक्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या छाप्यानंतर चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) च्या कलम ३, ४, ५, ७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३ अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे:
पोलिसांनी या प्रकरणी शिल्पा राजू लामा (वय ३५) आणि पूजा टीकाराम थापा (वय २९, दोघी रा. चोपडा) या दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर शिवाजी भिमराव पाटील, फरीद कबीर शेख, शाहबद वाहिद खान, शरिफ सत्तार तडवी, बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे, फिरोजी हंसा खान, बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे, संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र राजपूत (सर्व रा. चोपडा, जि. जळगाव) हे ९ आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पीडित महिलांना मिळाले संरक्षण
सुटका करण्यात आलेल्या पाचही पीडित महिला परराज्यातील आणि नेपाळमधील असल्याने या रॅकेटची पाळेमुळे खोलवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी सर्व महिलांची सुटका करून त्यांना कायदेशीर संरक्षण दिले असून, पुढील आवश्यक मदत व समुपदेशनाची कार्यवाही सुरू केली आहे.















Discussion about this post