भुसावळ : दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अमृत भारत विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर-मुजफ्फरपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कॅन्ट या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या भुसावळमार्गे धावणार आहेत.
हडपसर-मुजफ्फरपूर मार्गावर दोन साप्ताहिक विशेष गाड्या, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कॅन्ट मार्गावर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. हडपसर-मुजफ्फरपूर दरम्यान क्र. ०१४८१/०१४८२ ही साप्ताहिक अमृत भारत विशेष गाडी २० ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित वेळापत्रकानुसार धावेल. हडपसरहून दर मंगळवारी सायंकाळी ७.५५ वाजता सुटणारी ही गाडी गुरुवारी दुपारी १२ वाजता मुजफ्फरपूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात मुजफ्फरपूरहून दर गुरुवारी दुपारी १.१५ वाजता सुटून शनिवारी पहाटे २.४५ वाजता हडपसरला पोहोचेल. तसेच क्र. ०१४५३/०१४५४ ही दुसरी साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान हडपसरहून दर सोमवारी सायंकाळी ७.५५ वाजता सुटून बुधवारी दुपारी १२ वाजता मुजफ्फरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुजफ्फरपूरहून दर बुधवारी दुपारी १.१५ वाजता सुटून शुक्रवारी पहाटे २.४५ वाजता हडपसरला पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, प्रयागराज छिवकी, पाटलीपुत्र यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
विशेष रेल्वेसेवा
लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कॅन्ट दरम्यान क्र. ०१०४५/०१०४६ ही द्वि-साप्ताहिक अमृत भारत विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या गाडीला भुसावळसह कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, खंडवा आदी ठिकाणी थांबे असतील.















Discussion about this post