जळगाव : भुसावळ आणि मुक्ताईनगर उपविभागात गेल्या काही महिन्यांत मोबाईल चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल १५ लाख १९ हजार ९९८ रुपये किमतीचे १०९ मोबाईल शोधून काढले आहेत.
हे सर्व हस्तगत केलेले मोबाईल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना अत्यंत सन्मानाने परत करण्यात आले. आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला महागडा फोन परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले.
भुसावळ उपविभागात भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीतून १४ मोबाईल, बाजारपेठ पोलीस स्टेशनमधून २२ मोबाईल, तालुका पोलीस स्टेशन परिसरातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल तसेच नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतून १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले. या सर्व मोबाईलची एकत्रित किंमत ९ लाख ४४ हजार ४९८ रुपये आहे.
तर मुक्ताईनगर उपविभागात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ४१ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ५ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे. वरणगाव परिसरातूनही मोठ्या प्रमाणात मोबाईल हस्तगत करण्यात आले.
चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पुढेही विशेष कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.















Discussion about this post