राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘शिवसंवाद यात्रे’साठी खासदार शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात असताना समोरून अचानक एक वाहन आले. त्याला वाचवण्याच्या नादात ताफ्यातील चार गाड्या एकामागून एक एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळल्या. या अपघातात सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचारी सुखरूप आहेत.
अपघातग्रस्त गाड्यांमध्ये शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रवास करत होते. गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघातानंतरही खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपला नियोजित दौरा सुरूच ठेवला.
या अपघाताच्या सावटातून सावरत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांचा विस्तृत आढावा घेतला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्षसंघटनेची वज्रमूठ अधिक घट्ट करण्याचे आदेश दिले.















Discussion about this post