जळगाव । शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली भरघोस परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. कंपनीच्या मुख्य संचालक दाम्पत्याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून न्यायालयाने दोघांना २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीडब्ल्यूजे असोसिएट्स कंपनीने डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी सेमिनार आयोजित करून नागरिकांना शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीकडून सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत दरमहा आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
या माध्यमातून तब्बल २७९ गुंतवणूकदारांकडून २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची गुंतवणूक जमा करण्यात आली. मात्र ठरलेली मुदत संपूनही गुंतवणूकदारांना पैसे परत न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी भरत रतीलाल पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान जळगाव येथील कंपनीचा फ्रँचायझी चालक आणि मॅनेजर मिलिंद पाटील यालाही अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून गुंतवणुकीच्या नावाखाली आणखी किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे.















Discussion about this post