गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात अत्यंत कळीचा आणि तणावाचा ठरलेला अमेरिका-इराण वाद आता संपण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात एक व्यापक करार जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, या करारानुसार इराण आपल्याकडील समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे दोन्ही देशांतील युद्धाची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा करार केवळ युद्ध थांबवण्यासाठीच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होर्मुज स्ट्रेट’ (समुद्रधुनी) पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही समुद्रधुनी बंद असल्याने जागतिक इंधन पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव वाढला होता. हा करार पूर्ण होताच ही समुद्रधुनी व्यापारासाठी खुली केली जाईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
युरेनियमचे काय होणार?
माध्यमांतील वृत्तानुसार, अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा करार इराणच्या संमतीनेच आकारास येत आहे. आंतरराष्ट्रीय नियम आणि प्रक्रियेनुसार इराणकडे असलेला समृद्ध युरेनियमचा साठा हस्तांतरित केला जाईल. हे युरेनियम एकतर अमेरिकेला किंवा रशियाला दिले जाऊ शकते, अथवा त्याचे ऊर्जेत रूपांतर केले जाईल.
आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार, इराणकडे सध्या सुमारे ९७० पाउंड युरेनियम असून, त्यातील ६० टक्के साठा अत्यंत समृद्ध आहे. या साठ्यापासून इराण अणू बॉम्ब बनवू शकतो, अशी भीती पाश्चात्त्य देशांना सातत्याने वाटत होती.
इराणला आर्थिक दिलासा मिळणार
आगामी काही आठवड्यांत दोन्ही देशांमध्ये अणुकार्यक्रमाच्या भविष्यातील दिशेबाबत अंतिम चर्चा होणार आहे. या करारांतर्गत इराणची जगभरात जप्त केलेली आणि गोठवलेली कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती अमेरिका टप्प्याटप्प्याने मोकळी करणार आहे. त्यामुळे या करारातून आर्थिक संकटात सापडलेल्या तेहराणला (इराण) मोठा दिलासा मिळणार आहे.
इराण अधिकृत वक्तव्याबाबत अद्याप अस्पष्ट
अमेरिकेने या कराराचा मोठा दावा केला असला, तरी इराणकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खोमेनेई आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी यापूर्वी “समृद्ध युरेनियम इराणच्या बाहेर जाणार नाही, त्याचा वापर केवळ देशांतर्गत ऊर्जेसाठी केला जाईल,” अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे अमेरिकेच्या या दाव्यावर आता इराण काय अधिकृत भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post