नाशिक/एरंडोल : नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ येथे जळगावच्या एरंडोल येथील एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरकडे जात असताना झालेल्या या अपघातात ७२ वर्षीय कमळाबाई रामदास सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सूर्यवंशी व विश्वे कुटुंबीय सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर शनिवारी सकाळी ते त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले होते. म्हसरूळजवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.
या अपघातात कमळाबाई सूर्यवंशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वैशाली उमेश धुमावकर आणि शोभाबाई धोंडू विश्वे या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील इतर प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post