नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राघव चड्ढा यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्यसभा सचिवालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संसदीय राजकारणात पुन्हा एकदा चड्ढा चर्चेत आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा यांनी राज्यसभेतील आणखी सहा खासदारांसह आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २७ एप्रिल रोजी या सातही खासदारांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला होता. या घडामोडीनंतर राज्यसभेतील आम आदमी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली असून पक्षाकडे आता केवळ तीन खासदार उरले आहेत.
दरम्यान, राज्यसभेच्या याचिका समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून या समितीत एकूण दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राघव चड्ढा यांच्यासह हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रंगव्रा नारझारी आणि संतोश कुमार पी यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या आणखी एका पत्रकानुसार, सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी कॉर्पोरेट कायदा (दुरुस्ती) विधेयक २०२६ संदर्भातील संयुक्त समितीवर डॉ. मेनता गुरुस्वामी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
राघव चड्ढा यांच्या नव्या जबाबदारीमुळे भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे, आम आदमी पक्षातील मोठ्या फूटीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील भविष्यासंदर्भातही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.















Discussion about this post