पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान त्यांना जाहीरपणे प्रश्न विचारून एका रात्रीत जगभरात चर्चेत आलेल्या नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लेंग यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधानांना प्रश्न विचारल्यानंतर अवघ्या काही तासांतच मेटा (Meta) कंपनीने हेले लेंग यांची अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट्स अचानक सस्पेंड (ब्लॉक) केली आहेत. स्वतः हेले लेंग यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत या धक्कादायक कारवाईची माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी ओस्लो येथे भारत आणि नॉर्वे या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. ही परिषद संपवून पंतप्रधान मोदी बाहेर पडत असताना, पत्रकार हेले लेंग यांनी त्यांना मोठ्याने ओरडून एक थेट प्रश्न विचारला. त्यांनी विचारले होते, “पंतप्रधान महोदय, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?”
पंतप्रधानांनी या प्रश्नाला उत्तर न देता पुढे जाणे पसंत केले. मात्र, या घटनेचा काही सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि हेले लेंग जगभरात तसेच भारतातही जोरदार चर्चेत आल्या.
पंतप्रधान मोदींना असा थेट प्रश्न विचारल्यानंतर या परदेशी महिला पत्रकाराला भारतीय सोशल मीडिया युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या गदारोळानंतर लगेचच मेटा कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाती ब्लॉक केली. स्वतः हेले यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “माझं फेसबुक आणि इन्स्टा अकाऊंट ब्लॉक झालंय. मला अनेक भारतीयांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची होती, पण आता त्याला उशीर होईल. पण मी यामुळे दुःखी नाही, कारण प्रेस फ्रीडम म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मला मोजावी लागलेली ही खूप छोटी किंमत आहे.”















Discussion about this post