जळगाव/मुंबई । सध्या संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते बळीराजापर्यंत सर्वजण आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. अशा कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) येत्या २४ तासांच्या आत अंदमानात धडकणार असून २६ मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
अंदमानात मान्सूनसाठी पोषक वातावरण
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या परिसरात ढगांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनच्या वाटचालीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. हे पोषक वातावरण असेच कायम राहिल्यास मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर पुढील ७ ते ८ दिवसांत (जूनच्या पहिल्या आठवड्यात) तो महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर धडकेल.
जळगावात तापमानात घट
सध्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. मागच्या काही दिवसापासून जळगावमध्ये ४५ अंश तापमान असल्याने जळगावकर होरपळून निघाला. मात्र काल तापमानात घट दिसून आली. गुरुवारी ४५ अंशावर असलेला पारा शुक्रवारी ४२.४ अंशावर पोहोचला होता.
पुढील ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा
एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट असताना, दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात मात्र तापमान थोडे कमी झाले आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.















Discussion about this post