नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. या जागतिक संघर्षाची झळ आता थेट भारतीय अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशाला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, असे मोठे भाकीत रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले आहे.
स्वित्झर्लंडमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील इंधन दरवाढीचे थेट संकेत दिले. ते म्हणाले”जागतिक पातळीवरील हा तणाव जर दीर्घकाळ असाच कायम राहिला, तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणे अटळ आहे. सध्या सरकार आणि सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा आर्थिक भार स्वतः सोसत आहेत. सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी ठेवले आहे, तर तेल कंपन्याही तोटा सहन करून ग्राहकांवर भार टाकत नाहीत. मात्र, युद्ध लांबल्यास ही परिस्थिती जास्त काळ टिकवणे सोपे राहणार नाही आणि इंधन दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसेल.”
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी पेट्रोल-डिझेलचा कमी वापर करण्याचा आणि सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. देशाचा परकीय चलनसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारने सोन्यावरील आयात शुल्कही दुपटीपेक्षा अधिक वाढवले आहे. आता आगामी काळात आयातीत वस्तूंची मागणी कमी करण्यासाठी आणखी काही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.















Discussion about this post