पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या मुख्य निकालाच्या घोषणेनंतर आता लगेचच पुरवणी परीक्षेची तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा कमी गुणांमुळे श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून म्हणजेच मंगळवार, ५ मे पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in जाऊन आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. ही परीक्षा जून-जुलै महिन्यादरम्यान राज्यभरात घेतली जाईल.
निकाल कमी लागल्याने पुरवणी परीक्षेला महत्त्व
यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेत बोर्डाने परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या कॉपीच्या प्रकारांवर आणि गैरप्रकारांवर कडक पावले उचलली होती. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवल्यामुळे यंदा राज्याचा निकाल काहीसा कमी लागल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे अनेक विद्यार्थी काही गुणांनी अनुत्तीर्ण झाले आहेत, तर अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून बोर्डाने तातडीने पुरवणी परीक्षेचे नियोजन केले आहे.
या विद्यार्थ्यांना भरता येईल अर्ज :
मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी.
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी.
खासगी विद्यार्थी (१७ नंबरचा फॉर्म भरलेले).
आयटीआय (ITI) किंवा तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी.
महत्त्वाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
नियमित शुल्कासह अर्ज: ५ मे ते १५ मे २०२६
विलंब शुल्कासह अर्ज: १६ मे ते २० मे २०२६
महाविद्यालयांनी शुल्क जमा करण्याची मुदत: २१ मे पर्यंत
विभागीय मंडळाकडे याद्या सादर करणे: २५ मे पर्यंत














Discussion about this post