शिर्डी | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिर्डी दौऱ्यावर साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभेत बंडखोरी करून पक्ष सोडलेल्या माजी सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत त्यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर नाव न घेता कडाडून हल्लाबोल केला.
सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना उद्देशून मिश्कील टिप्पणी करत, “इथे कुणाच्या गाडीची चावी हरवली असल्याची घोषणा झाली. पण मी सांगतो, आपला खासदार पळून गेला आहे. तो कुठे सापडला तर त्याला परत आणू नका,” असे म्हणत सभेत एकच हशा पिकवला.
यानंतर त्यांनी विश्वासघाताच्या मुद्द्यावरून बंडखोरांवर निशाणा साधला. “आज कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. काही लोकांच्या रक्तातच गद्दारी असते. जिथे जातील तिथे फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात,” असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 2009 मध्ये जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते नंतर पक्ष सोडून गेले. मात्र, इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि जनतेचा कौल पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिर्डीच्या पवित्र भूमीचा उल्लेख करत त्यांनी साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशाची आठवण करून दिली. “आमची श्रद्धा साईबाबांवर, आपल्या कामावर आणि भगव्या ध्वजावर आहे. काहींना मात्र कोणत्याच गोष्टीवर श्रद्धा नाही. सत्तेसाठी रोज नवे आधार शोधण्याचे काम ते करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेच्या हव्यासापोटी काही नेते पक्ष सोडून गेले. मात्र जनतेचा आशीर्वाद आणि साईबाबांची कृपा कायम राहिली तर येत्या अडीच ते तीन वर्षांत राज्यात पुन्हा आपले सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाषणाच्या शेवटी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका मांडली. तसेच, “100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगावे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.















Discussion about this post