मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ज्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगली होती, त्या निवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही भाजपने ‘धक्कातंत्रा’चा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. यामधील भाजपच्या वाट्याला ६ जागा येत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, विवेक कोल्हे, संजय भेंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पज्ञा सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे २०२६ रोजी रिक्त होत आहेत. यामध्ये भाजपचे ४ आमदार आहेत. त्यामधील एकाही आमदाराला भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही. त्यांच्या जागी भाजपकडून नव्या उमेदवारांवर विश्वास दाखवला आहे.














Discussion about this post