जळगाव । शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज दुपारी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या एका भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला असून, या घटनेमुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ओम सुनील गिरी (वय २५) असं मयत तरुणाचं नाव असून हा तरुण आपल्या दुचाकीवरून मानराज पार्क चौफुलीजवळून जात असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओम ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच करुण अंत झाला. अपघात घडल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
हृदयद्रावक दृश्य: कुटुंबाचा टाहो
अपघाताची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून ओमच्या आई आणि बहिणीने जो आक्रोश केला, तो पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले. या हृदयद्रावक दृश्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती. नागरिकांच्या मदतीने ओमचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
मानराज पार्क चौफुली येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. “येथे स्पीड ब्रेकर आणि सिग्नल यंत्रणा का बसवली जात नाही?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.















Discussion about this post