जळगावातील पोलीस मुख्यालयात असलेल्या साहित्य खोलीला आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून, या आगीत पोलीस दलाचे महत्त्वाचे साहित्य आणि अनेक कागदपत्रे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी अचानक पोलीस मुख्यालयातील साहित्य खोलीला आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कार्यालयातील फर्निचर, पोलिसांचे तांत्रिक साहित्य तसेच कपाटात ठेवलेली जुनी आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून राख झाली आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून, मुख्यालयातील इतर महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.















Discussion about this post