जळगाव – राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी 2 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडे निवेदनही सादर करण्यात आले; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
बैठकीत सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करणे, उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, 2005 पूर्वीच्या प्रक्रियेतून नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण अंतिम वेतनावर देणे, रिक्त पदे भरणे, प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना लाभ पुनर्संचयित करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी यांसह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र राज्य विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ अध्यक्ष अजय बळवंत देशमुख, महासचिव संतोष मदने, कार्याध्यक्ष अरूण सपकाळे, उपाध्यक्ष सतिश वाघमारे, महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघ महासचिव मिलिंद भोसले, कार्याध्यक्ष कैलास पाथ्ररीकर, केतन कान्हेरे, महाराष्ट्र कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघ अध्यक्ष आनंदराव खामकर तसेच महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ अध्यक्ष प्रकाश मुरलीधर म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व राज्यभरातील सुमारे 100 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.














Discussion about this post