जळगाव । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावातील एका वीटभट्टी मजुराच्या मुलीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करत पोलीस दलात शिपाई म्हणून निवड मिळवली आहे. शाईस्ता दादाराव तडवी असे या होतकरू तरुणीचे नाव असून तिच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या शाईस्ताने शिक्षणासोबतच मोठ्या संघर्षाचा सामना केला. सात बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी असताना देखील तिने आपल्या स्वप्नांवर ठाम राहून कठोर परिश्रम घेतले आणि अखेर पोलीस भरतीत यश मिळवले.
शाईस्ता तडवीच्या या यशाचा आनंद गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या सन्मानार्थ गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गावकऱ्यांनी तिचे स्वागत करत अभिमान व्यक्त केला.
हिवरखेडा गावातील पहिली महिला पोलीस बनण्याचा मान शाईस्ताला मिळाला असून तिने गावाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. तिच्या यशामुळे गावातील इतर मुलींनाही प्रेरणा मिळत असून हा क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचा ठरला आहे. शाईस्ता तडवीची ही यशोगाथा संघर्षातून उभे राहून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणादायी कहाणी ठरत आहे.















Discussion about this post