चाळीसगाव – शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, जुने विमानतळ परिसर येथे सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या आणि कलावंतांना दिशा देणाऱ्या तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. समाजप्रबोधन, जनजागृती आणि युवकांमध्ये सांस्कृतिक चळवळीची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मिशनचे पाच पाटील प्रा. आर. एम. पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पथनाट्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र असून युवकांनी त्याचा सकारात्मक वापर करावा, असे प्रतिपादन केले. य. ना. चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक के. पी. रामेश्वरकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणिवा असलेले नागरिक बनावे, असे मार्गदर्शन केले.
मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामाजिक कार्यकर्त्या वैशाली निकम, संविधान प्रचारक व दिग्दर्शक शंकर यशोद, मांगीलाल मोरे, मनोज नगराळे, भीमाभाई खेद्रे पानपाटील, सविता राजपूत, जितेंद्र परदेशी, योगेश पाटील, निवृत्ती माळतकर, किरण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.उद्घाटनप्रसंगी विमलकिर्ती प्रकाशनातर्फे काॅम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” तसेच प्रा. गौतम निकम लिखित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ज्ञानदीप” ही पुस्तके आयोजकांना भेट देण्यात आली.
मान्यवरांनी पथनाट्य ही केवळ मनोरंजनाची कला नसून समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, पर्यावरण, संविधान जागृती आणि विविध सामाजिक प्रश्नांवर जनतेपर्यंत पोहोचणारे सशक्त माध्यम असल्याचे नमूद केले.
या तीन दिवसीय शिबिरात अभिनय, संवादकला, दिग्दर्शन, लेखन, समूह सादरीकरण, आवाजातील प्रभाव तसेच सामाजिक विषयांवर आधारित पथनाट्य सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.















Discussion about this post