जळगाव । शहरातील अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत, प्रशासनाने ‘भंगाळे गोल्ड’च्या संचालकांना ६० हजार १८० रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच समूहावर अशीच कारवाई करण्यात आली होती.
शहरातील वर्दळीच्या कालिंका माता चौकातील एक भव्य होर्डिंग आणि इच्छा देवी चौकाजवळील नमस्कार प्लाय शेजारील ३ होर्डिंग ही कोणत्याही परवानगीविना अनधिकृतपणे लावण्यात आली होती. याप्रकरणी ॲड. पियुष पाटील यांनी पुराव्यासह मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मनपाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आणि संबंधित व्यावसायिकांनी ६० हजार १८० रुपयांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत जमा केला आहे.
“प्रशासन सर्वसामान्यांवर लगेच कारवाई करते, मात्र मोठ्या व्यावसायिकांच्या बेकायदेशीर कृत्यांकडे डोळेझाक का करते?” असा परखड सवाल ॲड. पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला ही कारवाई करणे भाग पडले.
आतापर्यंत १.२० लाखांची वसुली
यापूर्वी हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंगवर देखील अशीच कारवाई झाली होती. तेव्हाही ६० हजार १८० रुपये दंड आकारण्यात आला होता. अशा प्रकारे केवळ अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे व्यावसायिकांकडून आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ३६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात चर्चेला उधाण
महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या इतर मोठ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. केवळ दंड वसूल न करता हे अनधिकृत होर्डिंग कायमचे हटवावेत, अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.














Discussion about this post