जळगाव । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात आज शनिवारी सकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले अभिवादन बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचे पडसाद उमटत संतप्त समाजबांधवांनी बस स्थानक परिसरात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले.
याबाबत असे की, शिरसोली येथील बस स्थानक चौकात भीमजयंतीच्या निमित्ताने भव्य बॅनर लावण्यात आले होते. आज सकाळी हे बॅनर फाडलेल्या अवस्थेत आढळल्याने भीमसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. समाजकंटकाच्या या कृत्यामुळे गावातील शांतता धोक्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आंदोलकांनी बस स्थानकावरच ठिय्या मांडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. “महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विकृत प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा आणि आरोपीला बेड्या ठोकाव्या,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी ‘रिपाई’चे नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी अतिरिक्त कुमक रवाना केली. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असे ठोस आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर सुमारे एक तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गावात पोलीस बंदोबस्त तैनात
सध्या शिरसोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयितांची चौकशी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post