जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत भुसावळ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरातील श्रीराम नगर परिसरात गावठी पिस्तुल (कट्टा) घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या नाशिकच्या एका तरुणाला पोलिसांनी शिताफीने पकडत संभाव्य गंभीर गुन्हा उधळून लावला.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रधारकांवर विशेष मोहीम सुरू असताना, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की श्रीराम मंदिर परिसरात एक तरुण कट्ट्यासह फिरत आहे. माहितीची खातरजमा होताच डी.बी. पथकाने तातडीने परिसरात सापळा रचला.
कमरेला कट्टा, खिशात काडतूस
पोलिसांनी संशयित संदीप सुनील जाधव (वय 23, रा. पंचवटी, नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेले सुमारे 20 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल (कट्टा) आणि खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या कारवाईमुळे भुसावळ शहरात अवैध शस्त्रांच्या हालचालींबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, नाशिकचा हा तरुण नेमक्या कोणत्या गुन्ह्याच्या तयारीत होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.















Discussion about this post