जळगाव । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या वादाला आता अधिकच धार आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्यावर जोरदार पलटवार करत खळबळजनक दावा केला आहे. भविष्यात ठाकरे गटात फुट घडवण्याच्या हालचाली स्वतः राऊतच करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी राऊत यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा-पारोळा मतदारसंघातील आमदार आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असा दावा केला होता. तसेच हे आमदार भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने ही माहिती खात्रीची असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
या दाव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेना पक्षाचे तुकडे होण्यामागे राऊत हेच कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांनी राऊत ‘मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत’ असा टोला लगावला. तसेच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याचा कोणताही विचार करू शकत नाही, असे स्पष्ट करत निष्ठेबाबत ठाम भूमिका मांडली.
दरम्यान, राऊत हे शिवसेनेचा ठाकरे गट फोडून नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करत पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post