नवी दिल्ली । नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होत असून यंदाही केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाचे नियम आणि धोरणात्मक बदल लागू करण्यात येत आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. विशेषतः एलपीजी सिलेंडरचे दर, आयकर प्रणाली, PAN कार्ड प्रक्रिया आणि रेल्वे तिकीट रद्द करण्याचे नियम यामध्ये लक्षणीय बदल होणार आहेत.
LPG मध्ये होणारे बदल
सर्वप्रथम LPG, ATF, CNG आणि PNG च्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच इंधन बाजाराच्या ताणाला सामोरं जावं लागलं होतं . या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या 1 एप्रिलपासून LPG सिलेंडरच्या नव्या दरांची घोषणा करू शकतात. याचा परिणाम थेट घरच्या LPGवर होऊ शकतो.
टॅक्समध्ये होणारे बदल
टॅक्सच्या नियमात सुद्धा मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिलपासून ‘आयकर अधिनियम, 2025’ लागू होणार आहे. 1961 पासून अस्तित्वात असलेला जुना कायदा बदलला जाणार आहे. नवीन करप्रणाली जास्त सोपी करण्याचा यामागचा उद्देश असणार आहे. करदात्यांवर असलेल्या नियमांचे ओझं याने कमी होणार आहे. या बदलांमध्ये Form 16 संदर्भातील नियमांमध्येही सुधारणा होणार आहेत. ITR भरण्यासाठी वापरला जाणारा Form 16 यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्याऐवजी नवीन स्वरूपातील दस्तऐवज दिला जाईल. तसेच Form 16A चे नाव बदलून Form 131 करण्यात येणार असून तो संबंधित तिमाही TDS विवरणानंतर 15 दिवसांत देणे बंधनकारक असेल.
PAN कार्डाचे नियम
PAN कार्डशी संबंधित नियमही जास्त कडक होणार आहेत. 1 एप्रिल 2026 पासून PAN कार्ड बनवताना अर्जदारांना जास्त कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच रखडलेले अर्ज तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
रेल्वे तिकीटाचे नियम
दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठीही नवीन नियम लागू होणार आहेत. 1 एप्रिलपासून ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. यापूर्वी ही मर्यादा चार तास होती. आठ ते 24 तास आधी तिकीट रद्द केल्यावर 50 टक्के परतावा मिळेल, तर 24 ते 72 तास आधी रद्द केल्यावर 25 टक्के कपात होईल. 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तुलनेने जास्त परतावा मिळणार आहे.















Discussion about this post